शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तर भारतीय संघातर्फे रक्षाबंधनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मानसोहळा

मुंबई दि.१७ : शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणीच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित रक्षाबंधन निमित्त स्त्रीशक्ती सन्मान सोहळा आणि पाच हजार बहीणींना साड्या भेट देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, उत्तर भारतीय संघाचे संतोष आरएन सिंह, उत्तर भारतीय संघाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील. अयोध्या हे सर्वांसाठी पवित्र स्थळ आहे. तेथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. उतर भारतीय संघाने महिला भगिनींसाठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे. तसेच येथील महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर ३१ ऑगस्टपर्यंत भरावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर भारतीय महिला, भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या. महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *