मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंगोलीच्या कावड यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली, दि. 12 (जिमाका): मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असून एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आनंदाचा शिधा, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षण आदी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी उपस्थितांना केले.

 

कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी दान स्वरुपात चार एकर जमीन दिली आहे. त्याठिकाणी विपश्यना केंद्र सुरु करण्यात येणार आहे. वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रास 800 कोटी रुपये निधी मंजूर आहे. तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह सर्व योजनांसाठीही भरीव निधी भरीव तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह अन्य विकासात्मक कार्यासाठी आमदार बांगर यांचे कौतुकही श्री. शिंदे यांनी केले.

अद्याप मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परंतु उर्वरीत कालावधीतही मुबलक पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी औंढा नागनाथ येथील नागनाथाला साकडे घातल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आमदार बांगर यांच्या पुढाकारातून मागील दहा वर्षांपासून कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव संस्थान येथून कावड यात्रा काढण्यात येते. कळमनुरी येथून काढलेली ही कावड यात्रा हिंगोलीतील कयाधू नदी तिरावरील अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येते. या यात्रेस कावडधारींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *