जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. १५: आरोग्य विभागास आता बाह्यस्रोतांद्वारे पदभरतीस मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने कार्यवाही करून रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत तसेच स्मार्ट पीएचसीची उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यालयात जिल्हा आरोग्य अभियानाची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खालीपे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट पीएचसीसाठी नियोजन विभागाने दिलेला निधी पूर्ण खर्च करण्यात यावा, अशा सूचना करून पालकमंत्री देसाई म्हणाले, काही पीएचसीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ती तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी तसेच ज्या ठिकाणी जुनी इमारत निर्लेखनाचे काम आहे, ते मार्गी लावावे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जेदार वस्तू उभारण्याची कामे पूर्ण करून मगच नवीन निधीची मागणी करावी, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीचीही बैठक झाली. त्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक तयार करणे, क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच जलतरण तलावाची थकीत असलेली रक्कम वसुलीस मंजुरी देण्यात आली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *