सातारा दि. १५: रानभाज्या या नैसर्गिक पद्धतीने उगवत असून त्या शरीरासाठी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून त्यांचा सन्मान करण्यासोबतच त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा येथील वृंदावन मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन पालकमंत्री देसाई केले. कृषी विभागाने नागरिकांना रानभाज्यांचे महत्त्व पटवून देतानाच त्यांचे संवर्धनही केले पाहिजे, रानभाजींची शास्त्रीय तसेच कोणत्या आजारावर प्रभावी आहे, याची माहितीपुस्तिका महिला बचत गटांच्या महिलांना वितरीत करावी, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना असून, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवावे, रानभाज्यांची विक्री ही रोजगाराची एक नवीन आणि उत्तम संधी आहे तसेच रानभाज्यांना बाजार पेठेत मागणी वाढत असल्याने या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी रानभाज्यांची बाजार पेठेत विक्री करावी, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.
००००