संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

सातारा, दि. १५: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे आगमन झाले. फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष राजू भोसले, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले, पोलीस बँड पथकामार्फतही विविध वाद्यांची धून वाजून स्वागत करण्यात आले.

नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *