विशेष फेरी-२ मध्ये ४७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश निश्चित

मुंबई, दि. १४ : राज्यातील अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरी-2 (मुलींकरिता विशेष फेरी) मध्ये 71 हजार 706 विद्यार्थ्यांनी अर्जाच्या भाग-2 मध्ये कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम अंतिम केला होता. त्यापैकी 53 हजार 824 विद्यार्थ्यांना 13 जुलै रोजी प्रवेश वाटप करण्यात आले असून 14 जुलैपर्यंत 47 हजार 330 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील 9 हजार 697 कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 14 लाख 87 हजार 757 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 63 हजार 20 विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. विशेष फेरी-2 साठी 71 हजार 706 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

विशेष फेरी-2 मध्ये प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई विभागाचा सर्वाधिक वाटा असून त्यानंतर पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर आणि लातूर विभागांचा समावेश आहे. नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेश फेरी 16 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे वर्ग 15 जुलै 2026 पासून शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील, असेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *