सन २०२३ पासून देवस्थान विकासांसाठी एक हजार कोटींचा निधी वितरीत – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे
नागपूर, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील मंदिरांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. सन २०२३ पासून राज्यातील मंदिरांचा विकास, भाविकांसाठी सोयीसुविधा यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ग्राम विकास मंत्री श्री. गोरे बोलत होते.
ग्राम विकास मंत्री श्री.गोरे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील श्री धान्नमा देवी, गुड्डापूर या तिर्थक्षेत्रास ब वर्ग दर्जा दिला आहे. श्री बनशंकरी देवस्थान, बनाळी, खलाटी येथील श्री महालक्ष्मी या देवस्थानांना ब वर्ग दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या शिवाय इतर देवस्थानांना ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्रस्ताव आल्यास सकारात्मक निर्णय घेतला जाईल. जत तालुक्याला देवभूमी दर्जा देण्याबाबत सदस्य श्री.पडळकर यांनी प्रस्ताव पाठवल्यास त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
००००
मुंबईतील उंच इमारत बांधकामांना सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
नागपूर, दि. 13 : मुंबईतील पुनर्विकास सुरु असलेल्या उंच इमारत बांधकामांसाठी सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. अशा सुरक्षा मानकांचा अवलंब केला जातो का नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य अनंत नर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी सदस्य मुरजी पटेल यांनी चर्चेत सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार उंच इमारतींच्या बांधकामांच्या सुरक्षा उपायांबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. जोगेश्वरी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीअंती जर विकासक दोषी आढळला, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल.
इमारतींचा पुनर्विकास म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून होत आहे. या ठिकाणी सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जोगेश्वरी अपघात प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/