विधानपरिषद लक्षवेधी

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर, दि. १२ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतिश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते. यावेळी सदस्य अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसी) यांना तत्काळ सोपविण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल. पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा उपस्थित करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

कोविड काळात उभारलेले ऑक्स‍िजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालविण्यास देणे विचाराधीन

– सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

नागपूर, दि. १२ :- राज्यात कोविड काळात अत्यावश्यक म्हणून उभारण्यात आलेले ऑक्स‍िजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देणे विचाराधीन असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

कोविड काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट संदर्भात सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर,सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले की, कोविड काळात सुरू करण्यात आलेले ऑक्सीजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देण्याबाबत बैठक घेण्यात आली असून याबाबतचा आराखडा करण्यात आला आहे.

खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) देण्यात येणारे ऑक्स‍िजन प्लांट आपत्कालीन परिस्थितीत पुन्हा शासनास वापरण्यास मिळतील असे सांगत मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात सुरू करण्यात आलेले ऑक्स‍िजन प्लांट कोणत्याही परिस्थितीत विनावापर रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकांनी कोविड काळात उभारलेल्या ऑक्स‍िजन प्लांटबाबत असाच निर्णय घेण्यासाठी कळविले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोविड काळात ऑक्स‍िजन प्लांट उभारणीमध्ये ज्या ठिकाणी अनियमितता झाली असेल त्याची चौकशी करून संबंधितावर  कारवाई करण्याचे  निर्देश दिले जातील, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री  आबिटकर यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

विकास प्रकल्पांच्या देखरेखीबाबत सिडको, पीएमसी, लोकप्रतिनिधींची

संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासन उचित निर्णय घेईल – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर दि. १२ :-  सिडको, पीएमसी हद्दीतील विकासकामाचे नियोजन, प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांवर देखरेख, नियंत्रण यासाठी महानगरपालिका प्रतिनिधी, सिडको प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य विक्रांत पाटील यांनी या संदर्भात विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.

नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका, नैना प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे, विकासप्रकल्प सुरू आहेत. या विकासकामांचा, प्रकल्पांचा मुख्यमंत्री वॉररूममार्फत नियमित आढावा घेतला जात असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले, पनवेल महानगरपालिका नागरी क्षेत्रात वाढ होत असल्याने पनवेल महानगरपालिकेने सुधारित नागरी विकास आराखडा (डीपी) शासनास सादर केला असून या आराखड्यात रस्ते व मूलभूत पायाभूत सोयी सुविधांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेची सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजना शासनाकडे मंजुरीस्तव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा खारघर सेक्टर- १६ येथील डीएव्ही स्कूल येथे सुरू होऊन सीबीडी बेलापूर मार्गे सीवूड्स सेक्टर-५२ मधील डीपीएस शाळेजवळ पाम बीच रोडला जोडला जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नवीन पनवेल रोडसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील रस्ता उपलब्ध असून हा रस्ता जोड रस्त्यामार्फत खारघर कोस्टल रोडला जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन  असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

तसेच विकास प्रकल्पांच्या कामात सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार; एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

नागपूर, दि. १२ :- नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात विधान परिषदेत उपस्थित लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर, परिणय फुके आणि चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, नागपूर – मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा  समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याला समृद्ध करणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. तसेच  या महामार्गावर विविध पार्क उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर सध्या २२ ठिकाणी इंधन स्थानके व स्नॅक्स सेंटर स्वच्छतागृहासह कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून २१ ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. महामार्गावर सात ठिकाणी तात्पुरत्या हॉटेलची व्यवस्था करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी महामार्ग सुविधा विकसित करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

हडपसर परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी गती देणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर, दि. १२ : हडपसर परिसरातील नागरी समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असून, विविध प्रकल्पांची कामे गतीमान करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य उमा खापरे यांनी हडपसर परिसरातील नागरी समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले की, स्वागत हॉटेल जवळील मार्वल ब्यूटी ते साधना बँक जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास पावसाळ्यात विलंब झाला होता. मात्र, सध्या हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईनचे आवश्यकतेनुसार काम पूर्ण झाले आहे. चढावाच्या भागाला योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठीचा बूस्टर पंप बसविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी झाडे छाटणे किंवा स्थलांतरित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली असून, परवानगी मिळाल्यानंतर झाडे छाटणे, पुनर्रोपण व वृक्षारोपणाची कार्यवाही पथ विभागामार्फत करण्यात येणार आहे.

साडेसतरानळी गावाजवळील यश हॉस्पिटल परिसरात पावसाचे पाणी साचणे व रस्ता खराब होण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच लेबरशेड मजूरवस्तीची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने संबंधित मालकाशी ती ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू असून, जागा ताब्यात आल्यावर रस्ता विकासाची प्रक्रिया गतीमान केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *