विधानसभा लक्षवेधी

पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे

नागपूर, दि. १२ : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील शेळके, अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री भुसे म्हणाले की, पुण्याच्या ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसी व एमएसआयडीसीमार्फत रिंग रोड, इतर रस्ते विकसित करणे आणि हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉर या प्रमुख प्रकल्पांवर काम सुरु आहेत.

पुणे रिंग रोडला गती; पूर्व-पश्चिम टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर

पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. रिंग रोड पूर्वमधील 12 पैकी नऊ पॅकेजेसची कामे वेगाने सुरू असून उर्वरित तीन पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेसाठी प्रक्रियेत आहेत. ही तिन्ही पॅकेजेस मे 2026 पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच ऑक्टोबर 2026 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

रिंग रोड पश्चिममधील सर्व पाच पॅकेजेसची कामे प्रगतीपथावर असून प्रकल्पाची पूर्णता मुदत पश्चिमेस मे 2027 तर पूर्वेस मे 2028 अशी निश्चित करण्यात आली आहे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

रस्ते प्रकल्पांना वेग

पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी एमएसआयडीसीकडून जलद कामकाज सुरू आहे. हडपसर–यवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणे–शिरूर या सहा पदरी रस्त्याला मंत्रिमंडळने मान्यता दिली असून निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. शिरूर–छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.  तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.

हडपसरलोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरला गती

महामेट्रोकडून 11.8 कि.मी. लांबीच्या मेट्रोला मंजुरी दिली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. फ्लायओवर क्रॉसिंगसारख्या तांत्रिक अडचणींसाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले असून फिजिबिलिटी तपासणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवत प्रकल्पांच्या परवानग्या, भूसंपादन आणि कामांची गती यावर नियतकालिक आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

सोलापूर- पुणे रस्त्या संदर्भात बैठक झाली असून हे काम करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार मंत्री डॉ.उदय सामंत

नागपूर, दि. १२ : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन विभाग आणि ट्रॅफिक प्लॅनर नेमण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.

000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता नाहीमहिला तक्रारीवरील तपास अंतिम टप्प्यात– मंत्री डॉ. उदय सामंत

नागपूर, दि. १२ : नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात आर्थिक अनियमितता प्रकरणी पोलीस चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार कोणतीही अनियमितता आढळली नाही. महिला तक्रारीवरील प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील आर्थिक अनियमितता व सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रार प्रकरणी सदस्य कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ.सामंत यांनी उत्तर दिले.

आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले की, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देयके योग्य प्रक्रियेनुसार मंजूर करण्यात आली आहेत. देयकांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे नमूद केले आहे. तसेच, संबंधित देयके संचालक मंडळाच्या ठरावानेच मंजूर करण्यात आली होती, असे या अहवालात नमूद केल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.

महिला तक्रारीवरील प्रकरणावर रस्तोगी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. वरिष्ठ महिला अधिकारी या समितीत असून ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. या समितीचा अहवाल शासनाकडे आल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

पुरंदरमध्ये १९१ किलो मीटर रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी; ११९ कोटींच्या रस्ते रुंदीकरण कामांना वेग – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

नागपूर, दि. १२ : पुरंदर तालुक्याचा रस्ते विकास वेगाने पुढे नेत १९१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीस शासनाने मंजुरी दिली असून अंदाजे ५ कोटी रुपयांच्या कामांना गती मिळाली आहे. यासोबतच ७६ किमी सायकल ट्रॅकचे रुंदीकरण आणि एकूण ११९ कोटी रुपयांची विस्तृत कामे पुरंदरमध्ये सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

सदस्य विजय शिवतारे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री भोसले म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील 383 कि.मी. पंचायत समितीचे रस्ते व 268 कि.मी. एमडीआर रस्ते पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने 191 कि.मी. रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी दिली आहे.

मंत्री भोसले म्हणाले की,  पुरंदरमध्ये एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क आणि मोठी गुंतवणूक येत असल्याने तालुक्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. गुणवत्ता हा आमचा मुख्य निकष असून कुठेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. रस्त्यांवरील डीएलपीअंतर्गत उर्वरित कामे संबंधित ठेकेदारांकडून पूर्ण करून घेतली जात आहेत. अधिकारी किंवा कंत्राटदारांकडून कुठेही अनियमितता झाल्यास कडक चौकशी व आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, मांढरदेव यात्रेपूर्वी राजगड तालुक्यातील सर्व रस्ते पूर्णपणे दुरुस्त केले जातील असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

परतूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना गती दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

नागपूर, दि. १२ : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील 173 गावे आणि 95 गावे या दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना नव्याने गती देत कामे पूर्ण करण्यासाठी तातडीची कार्यवाही सुरू असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य बबनराव यादव ( लोणीकर) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, 173 गावे योजनेवर आतापर्यंत 226 कोटी खर्च झाला आहे. 146 गावांमध्ये योजनेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांतील काही तांत्रिक अडचणी आणि महामार्गाच्या कामामुळे झालेल्या अडथळ्यांचे निराकरण जलदगतीने सुरू आहे. ज्या गावांमध्ये टॅपिंग पॉईंट उपलब्ध आहेत, त्या गावांना लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. 95 गावे प्रादेशिक योजना 87 गावांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी विजबिलाशी संबंधित मुद्दे सोडवण्यासाठी विभागाने तातडीची पावले उचलली आहेत. दोन दिवसांत सर्व बंद गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

कामकाजातील त्रुटींची चौकशी सुरू असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले की, काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. संबंधित कंत्राटदारांनी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आवश्यक असल्यास दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल. केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर राज्य शासनाने 2100 कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती दिली आहे. लोकांना पाणी मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. उर्वरित सर्व अडथळे दूर करून योजना पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *