राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स गठीत – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. २९: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ॲकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी), मेजर-मायनर पद्धती, इंटरर्नशिप, इंडियन नॉलेज सिस्टिम (आयकेएस), तसेच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध शैक्षणिक, प्रशासकीय व तांत्रिक बाबींमध्ये एकसमान मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.

टास्क फोर्समार्फत चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षाची रचना, ओजेटी/इंटर्नशिप संदर्भातील कार्यपद्धती, क्रेडिट ट्रान्सफर, मल्टीपल एंट्री-एक्झिट, मायग्रेशन, युनिफॉर्म ॲकेडेमिक कॅलेंडर आयकेएस अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी मदत कक्ष, तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय, राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमधील एनईपी अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या शिफारशी शासनास सादर करण्यात येणार आहेत. ही समिती दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणार आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भातील शासन निर्णय –
202605291623036008

००००

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *