महाविद्यालयांमध्ये २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह’- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २६ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांना समाजाभिमुख कार्यात सहभागी करून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावता येते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मानवता, सहकार्य, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, साक्षरता मोहिमा, रक्तदान शिबिरे यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना समाजाशी थेट जोडणारी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी प्रभावी योजना आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *