बालकांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी ‘मानस’ प्रकल्प महत्त्वपूर्ण – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ९ : मानसिक आरोग्य हा सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जबाबदारीचा महत्त्वपूर्ण भाग बनला असून, राज्य बाल हक्क आयोगामार्फत राज्यातील दहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा ‘मानस’ प्रकल्प बालकांना भावनिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच राज्यातील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक येथे आयोजित करण्यात येणारा बालस्नेही कुंभमेळा देखील महत्त्वाची भूमिका बजावेल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
राज्यातील बालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव पंकज देवरे, आयोगाचे अध्यक्ष ॲड संजय पुराणिक, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, वंदना जैन तसेच आयोगाचे सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, संजय लाखेपाटील, अतुल देसाई, प्रवीण भुजाडे आणि मिलन जंगम उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, बाल संरक्षण, बालमजुरी प्रतिबंध, बाल आरोग्य व पोषण, बालविवाह प्रतिबंध, बाल तस्करी व बाल शोषण प्रतिबंध तसेच पोक्सो कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. बालकांना सर्वोतोपरी सुरक्षा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना, धोरणात्मक सूचना आणि शिफारशी करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

लग्नपत्रिकांवर वधू-वरांची जन्मतारीख नमूद करणे सक्तीचे

बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकांवर वधू-वरांची जन्मतारीख नमूद करणे सक्तीचे करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांच्या वयाचा आधार कार्ड हा पुरावा ग्राह्य न धरता जन्मतारखे दाखला वैध मानण्याबाबत आवश्यक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये बालस्नेही पंचायत, मानस प्रकल्प, बाल रक्षा अभियान, सखी सावित्री समिती सक्षमीकरण, चिराग ॲप, डिजिटल सुरक्षा उपक्रम, बालस्नेही पोलिस स्टेशन, पोक्सो कायद्यांतर्गत सपोर्ट पर्सन नियुक्ती तसेच बार्टी, शबरी, सारथी, महाज्योती आणि मौलाना आझाद मंडळ यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश होता.

याशिवाय बालगृहांमधील कनिष्ठ काळजीवाहकांचे प्रशिक्षण, बालकांच्या संरक्षणासाठी यंत्रणांचे सक्षमीकरण आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या भविष्यातील दृष्टीकोनाबाबतही माहिती देण्यात आली.

मंत्री आदिती तटकरे यांनी बालकांच्या हक्कांचे संरक्षण, मानसिक आरोग्य संवर्धन आणि सुरक्षित बालपणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *