पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १७: पैठण शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उर्वरित ४०० घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पैठण शहरातील इतर विकास कामांतर्गत पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे, आपेगाव येथील मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पूर्ण करण्यात यावीत. याचबरोबर पैठण शहरातील विविध विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

मंत्रालयात पैठण नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार विलास गुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी अंभोरे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नगर परिषदेमार्फत स्थानिक निधीतून घनकचरा व्यवस्थापन कामे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यसेवेद्वारे करण्यात यावीत. कचरा संकलन, रस्ते झाडलोट, नालेसफाई, कचरा वाहतूक तसेच मान्सून तयारीच्या अनुषंगाने शहरातील मोठे नाले जेसीबीद्वारे स्वच्छ करण्यात यावेत. घनकचरा व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, जिल्हावार्षिक योजनेंतर्गत दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स व शिवाजी बालउद्यान, ६८ व्यावसायिक गाळ्यांची कामे पूर्ण करावीत.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *