नाशिक, दिनांक १५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपच्या ‘समृद्धी’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
समृद्धी हा Piramal Foundation For Education Leadership च्या नेतृत्वाखालील शिष्यवृत्तीचा लाभ अधिक सुलभ आणि प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणारा उपक्रम आहे. पात्र विद्यार्थ्यांना, विशेषतः वंचित व असुरक्षित समुदायातील मुलींना, शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय शिष्यवृत्तीची माहिती, अर्ज प्रक्रियेसाठी सहाय्य आणि वेळेवर लाभ मिळवून देण्यावर या उपक्रमाचा विशेष भर आहे.
नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली समृद्धी हा उपक्रम शाळा, विविध शासकीय विभाग आणि समुदायाशी संबंधित संस्थांसोबत जवळून समन्वय साधून काम करेल. माहितीचा अभाव, आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक सहाय्य न मिळाल्यामुळे एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
याचबरोबर मुलींचे आरोग्य, शाळेतील मुलींची सातत्यता वाढवणे, पालकांना शिक्षणाप्रती जागरूक करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
000000