जलसंधारण सप्ताह महावॉकेथॉन लोगोचे अनावरण
बीड, दि. १५ (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर या विशेष कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांग गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आरोग्य सेवांचा विस्तार करत ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या नवीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना हक्काच्या आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
पाणी बचतीचा आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आयोजित जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महावॉकेथॉनच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जलसंधारणाची सामूहिक शपथ देण्यात आली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. बीड जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य, गायन सादर केले तसेच शिक्षण विभागाकडून बालविवाह प्रतिबंधक नाटीका सादर केली यास प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
0000