धुळे, दिनांक १ मे २०२६ (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्यात येत आहे. आजपासून 15 मे पर्यंत स्व-गणनेचे काम सुरू झाले आहे. या जनगणनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, उपमहापौर ज्योत्सना पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महाराष्ट्र राज्याने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहीला आहे. सन 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा ध्यास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी जोपासला असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी उन्हापासून स्व- संरक्षणाची काळजी घ्यावी. त्यातही वृद्ध आणि बालकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षणाची पुरेशी साधने वापरावीत. भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य एल निनोचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापन करणे, वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध मध्यम प्रकल्पात 50 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी येत्या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेतून 100 टक्के अनुदानावर मका व शुगर ग्रेज बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी 3 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांची कोणतीही टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत.
तसेच जिल्ह्यातील अधिकाधिक खातेदार शेतकऱ्यांनी सुद्धा एआय महाविस्तार ॲप डाऊनलोड करून घ्यावे. खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, खासगी बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ मिळणार आहे. याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
प्रादेशिक संतुलित विकासाला चालना मिळावी व सर्व समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आकांक्षित जिल्हात धुळे जिल्ह्याचा व तालुक्याचा समावेश झाला आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना व केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून विकासाला गती मिळणार आहे. जिल्ह्यात नवीन उद्योग भवनसाठी 14 कोटी 80 लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय कक्षामार्फत गंभीर आजारांच्या 68 रुग्णांना उपचारासाठी 52 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) सुरू झाले असून मतदारांनी आपल्याकडे येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी केले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे साध्य केली जात आहेत. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळण- वळणाच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. शासनाच्या वतीने आजपासून 15 मे पर्यंत स्व- गणनेचे काम सुरू झाले आहे. या जनगणनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आणि एआय आधारित ई सुविधा पोर्टलचे मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या पोर्टलमुळे नागरिकांना सेवा गतिमान पद्धतीने मिळतील. याबद्दल जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे त्यांनी अभिनंदन केले.
धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आगामी काळात जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेली सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना, बोरविहीर- नरडाणा रेल्वे मार्ग, औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील राहील. त्यामुळे येत्या काळात धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झालेला पाहावयास मिळेल, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
यांचा झाला सन्मान….
महसूल विभागात आदर्श ग्राम महसूल अधिकारी श्रीमती आशा विठ्ठल कुंभार, नवभारत नवसाक्षर कार्यक्रमाबाबत खान शहिदा मजरुद्दीन, जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त माजी महापौर जयश्री कमलाकर अहिरराव (2020-21) , वैशाली चंद्रशेखर पाटील ( 2021-22) श्रीमती कल्पना भागवत (2022-23), ॲड. रंजना पाटील ( 2023-24) यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सन 2025-2026 या वर्षांसाठी खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरुष) पुरस्कार हेमांशु राजेंद्र पाटील ( रायफल शुटींग), जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार मनिषा हिरालाल माळी (कायकिंग व कॅनोइंग ), जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू कु.दर्शना राजेंद्र गवते (रायफल शुटींग), जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार उमेश गोरख येरडावकर (ज्युदो). तसेच सन 2025-2026 वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक) भुषण संजय पाटील, तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नगावबारी, धुळे अध्यक्ष चेतन पाटोळे यांना पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
धळे जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजन दुसाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक मसुद अहमद शेख सफदर, विलास पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक केशवराव फुलपगारे, पोलीस हवालदार ललित पाटील, संजय सुर्यंवशी, जितेंद्र पाटील, पंकज खैरमोडे, इरफान मलिक, चालक पोलीस हवालदार विलास पाटील, सुनिल कुलकर्णी, पोलीस हवालदार योगेश कचवे, कल्पेश जगताप यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
संविधना दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा भांडणे ता.साक्री येथील प्रिया गांगुडे ही राज्यातून दुसरी आल्याने तिला 10 हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या 5 टक्के सेस फंडातून अस्थिव्यंग दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात एक स्वयंचलित 3 चाकी मोटोराईज्ड सायकल यावेळी पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते देण्यात आली.
सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गंत एचपीसीएल आणि युनिट ऑफ सायन्स ॲण्ड एज्युकेशन डेव्हलपमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील 100 गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शालेय दप्तर व डेस्कचे वितरण यावेळी करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक 6, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) मोबाईल फॉरेन्सिक इन्हेुळस्टीगेशन व्हॅन, पोलीस विभागाचे चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल आदी संचलनात सहभागी झाले. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
00000