पावशेवाडी प्रकल्पग्रस्तांच्या निवासासाठी जमिनीचा प्रस्ताव सादर करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. १: कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत मौजे पावशेवाडी (ता. जि. सातारा) येथील प्रकल्पग्रस्त व बाधित नागरिकांच्या निवासासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने सादर करावा. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी मुख्य अभियंता अलका अहिरराव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पावशेवाडी येथील प्रकल्पग्रस्त व बाधित नागरिकांसाठी जलसंपदा विभागाकडील जमीन उपलब्ध झाल्यानंतर त्यावरील पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

बैठकीत लिंब ग्रामपंचायत (जि. सातारा) येथील कातकरी वस्तीच्या रस्त्यासाठी धोम उजव्या कालव्यालगत बांधकाम परवानगी तसेच मौजे हातगेघर (ता. जावळी, जि. सातारा) येथील शेतीसाठी प्रस्तावित उपसा सिंचन योजनेबाबतही  चर्चा करण्यात आली.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *