‘मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा

ठाणे, दि.२७(जि.प.ठाणे) : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, दि. २७ एप्रिल, २०२६ रोजी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. हा शुभेच्छा समारंभ जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मिशन भरारी’ हा केवळ उपक्रम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा एक व्यापक प्रयत्न आहे. आपल्या मातीतल्या लेकरांना आभाळाशी नाते जोडण्याची ही संधी आहे. अल्पावधीत, केवळ तीन महिन्यांत हा उपक्रम प्रत्यक्षात उतरविणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे. पूर्वी सरकारी कामांना विलंब होत असल्याची धारणा होती; मात्र आज शासनाच्या कार्यपद्धतीत वेग आणि परिणामकारकता दिसून येते.”

ते पुढे म्हणाले, “या स्पर्धेतून निवड झालेले ५९ विद्यार्थी हे माझ्या दृष्टीने ‘सायन्स सोल्जर्स’ आहेत. जसे सीमेवरील जवान देशाचे रक्षण करतात, तसे हे विद्यार्थी देशाचे वैज्ञानिक भविष्य घडवतील. विज्ञान म्हणजे केवळ माहिती नसून जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे. ‘का?’ हा प्रश्न विचारण्याची सवय जोपासा. हीच सवय तुम्हाला मोठ्या शोधांपर्यंत घेऊन जाईल.”

“ही सहल केवळ पर्यटन नसून प्रत्यक्ष विज्ञानाचा अनुभव देणारी आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा रॉकेट लाँचिंग स्टेशन यांसारख्या ठिकाणी भेट देताना मिळणारा अनुभव तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. शाळेतील ३६५ दिवसांच्या शिक्षणाइतकेच हे काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, “ग्रामीण भागात अपार क्षमता आहे. योग्य संधी आणि व्यासपीठ दिल्यास ही मुलेही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतात. भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून  ए. पी. जे. अब्दुल कलाम किंवा कल्पना चावला यांच्यासारखे शास्त्रज्ञ घडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि देशासाठी कार्य करण्याचे आवाहन करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, ‘मिशन भरारी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक ठरणारा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांच्या विचारविश्वाला व्यापकता देण्याचा हा प्रयत्न आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल, तसेच त्यांच्या मनात विज्ञान, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण होईल. पाठ्यपुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळेल. भविष्यात हेच विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करून समाज आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा आम्हाला विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य निरंजन डावकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे, पालक सचिव ठाणे नवीन सोना, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिचंद्र बा. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कार्यक्रम अधिकारी संजय बागुल तसेच विविध मान्यवर व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘मिशन भरारी’ या उपक्रमाचे औपचारिक अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून दि. २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर अल्पावधीतच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दि.२७ एप्रिल २०२६ ते १ मे २०२६ या कालावधीत देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हा अभ्यासदौरा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक व वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळणार असून तिरुअनंतपुरम व कन्याकुमारी येथील विविध वैज्ञानिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन, केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम व प्रियदर्शिनी प्लॅनेटेरियम यांसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद स्मारक, थिरुवल्लुवर पुतळा आदी स्थळांनाही भेट दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) अंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘मिशन भरारी’ अंतर्गत सन २०२५-२६ या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात अंबरनाथ तालुक्यातून १६, भिवंडी तालुक्यातून १२, कल्याण व मुरबाड तालुक्यातून प्रत्येकी १०, तर शहापूर तालुक्यातून ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थी मराठी माध्यमातील (२५ मुले व २९ मुली) तर ५ विद्यार्थी उर्दू माध्यमातील (२ मुले व ३ मुली) आहेत.

कार्यक्रमात विद्यार्थिनी जिया शरद हलपतराव (जि.प. शाळा शेलवली बांगर, ता. शहापूर) हिने मनोगत व्यक्त करताना म्हणाली, “मिशन भरारी या उपक्रमांतर्गत आम्हाला मिळालेली ही संधी आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही एवढ्या मोठ्या वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळते, हे आमच्यासाठी स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नाही. या संधीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री, जिल्हा प्रशासन तसेच आमच्या शिक्षकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. या अभ्यासदौऱ्यातून आम्हाला विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्यातून नक्कीच नवे शिकायला मिळेल.,” असे तिने सांगितले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

000000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *