‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’द्वारे इतिहास, श्रद्धा आणि शौर्याचा संगम – एक प्रेरणादायी पर्यटन अनुभव – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव, ३ जून : – भारतीय पर्यटन रेल्वेच्या ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ही विशेष रेल्वे यात्रा ९ जून २०२५ पासून सुरू होत असून, स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासात डोकावण्याची ही एक अद्वितीय संधी आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाच्या नियोजनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून या सहलीस प्रारंभ होणार असून, ५ रात्री ६ दिवसांच्या कालावधीत रायगड, लाल महाल, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळा ही ऐतिहासिक स्थळे पाहता येणार आहेत. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, भारतीय रेल्वे व पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या नियोजन बैठकीस उपस्थित होते.

ही विशेष टूर केवळ पर्यटन नसून शिवप्रेमी व इतिहासप्रेमींना शिवचरित्राशी नाळ जोडण्याचा एक अध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे. “शिवचरित्राच्या पवित्र ठिकाणी एकदा तरी अवश्य जा!” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

या टूरचे ऑनलाईन बुकिंग सुरू असून www.irctctourism.com या संकेतस्थळावर इच्छुक प्रवाशांना नोंदणी करता येईल. IRCTC मार्फत भोजन, निवास, वाहतूक व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जागा मर्यादित असल्याने लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *