सांगली जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची 156.54 कोटींची कर्जमुक्ती

सांगली, दि. ७ (जि. मा. का.) : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ आज डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 हजार 725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 156.54 कोटी रुपये कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली तसेच संबंधित अधिकारी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 हजार 726 लाभार्थ्यांच्या खात्यावर 132.85 कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1 हजार 999 लाभार्थ्यांच्या खात्यावर 23.69 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 68 हजार 981 पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56 हजार 962, तर राष्ट्रीयकृत बँकांची 12 हजार 19 कर्जखाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील 38 हजार 410 पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. त्यापैकी 31 हजार 944 पात्र लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अद्याप 6 हजार 418 पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 5 हजार 598 लाभार्थ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांपैकी 4 हजार 509 लाभार्थ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक क्रमांक काढलेला नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन ॲग्रीस्टॅक क्रमांक काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

तसेच जिल्ह्यातील 1 हजार 676 पात्र शेतकरी मयत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी महसुली दप्तरी वारस नोंद करून त्याची पूर्तता संबंधित सेवा संस्था तसेच राष्ट्रीयकृत बँकेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत पात्र शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित तालुक्यातील उप निबंधक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *