मुंबई, दि. ४ : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मे. गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पात्र कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीतील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली.
विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या कंपनीतील सुमारे ३०० कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांना कायम कामगारांप्रमाणे समान वेतन व सुविधा मिळावी, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघामार्फत करण्यात आली होती. या बैठकीस भाई जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, उपसचिव (कामगार) स्वप्निल कापडणीस, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड यांच्यासह कामगार संघटनेचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगारांचे हित आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. समान कामासाठी समान वेतन हे तत्व लक्षात घेऊन संबंधित कंपनीने कामगारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी करावी. या प्रकरणी कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही, याची शासन पूर्ण काळजी घेईल. अधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदींनुसार सर्व बाबींची तत्परतेने पडताळणी करून याबाबतचा अहवाल विहित वेळेत सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, संबंधित कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सामोपचाराने व सकारात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यात यावा. कामगारांच्या हक्कांबाबत शासन गंभीर असून, न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यात येईल. जे कामगार कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र आहेत, त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी. त्यासाठी कामगार संघटनाच्या प्रतिनिधीना विश्वासात घ्यावे आणि हा प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडवावा असे निर्देश मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी दिले.
0000