ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना – मंत्री नितेश राणे

रायगड-अलिबाग,दि. १३ (जिमाका) : जंजिरा किल्ला हा राज्याच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढीसाठी जंजिरा किल्ला परिसरात उभारण्यात येणारा ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.

मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला येथे महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जंजिरा किल्ला ब्रेकवॉटर व प्रवासी जेटी बांधकाम’ प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुनील तटकरे अध्यक्षस्थानी होते. तसेच मुरुड-जंजिरा नगराध्यक्षा आराधना दांडेकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, तहसिलदार आदेश डफळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले की, सुमारे तीन किलोमीटर परिसरात लाटरोधक भिंत उभारण्यात येत असून या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांच्या विकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जंजिरा परिसरात सी-वॉक, रिसॉर्ट, वॉटर मेट्रो, रेस्टॉरंट तसेच विविध पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना राणे यांनी सांगितले की, मुंबईच्या वॉटर मेट्रोच्या धर्तीवर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही जिल्हे जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे देशांतर्गत पर्यटन व व्यापाराला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि पर्यटन विभाग हे परस्परपूरक विभाग असून पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित करण्याचा विचार करावा, जेणेकरून भविष्यातील पेट्रोल-डिझेल संकटाला सामोरे जाणे सुलभ होईल. इलेक्ट्रिक बोटींसाठी मत्स्यव्यावसायिकांना शासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल,अशी ग्वाहीदेखील मंत्री राणे यांनी यावेळी दिली.

खासदार सुनील तटकरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, या प्रकल्पामुळे जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना भरती-ओहोटीच्या काळातही सुरक्षित चढ-उतार सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच मत्स्यव्यवसायासाठी आधुनिक सुविधा विकसित करण्यात येत असून मासळी लिलाव गृह, जाळी वाळविण्याचे शेड, विश्रामगृह, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर तसेच स्वच्छतागृह सुविधांचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत राज्य हिस्सा निधीतून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे रु.111.41 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA) यांच्याकडून प्रकल्पास पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली असून सुमारे 250 मीटर लाटरोधक भिंतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. पाईल जेटी व अल्युमिनियम गँग-वे उभारणीचे काम मे. डी.डी.पी. फॉरकॉन (JV) यांना देण्यात आले असून प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे रु. 107 कोटी खर्च करण्यात आला आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *