इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीत ६.८० लाख विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रमासह अर्ज

मुंबई, दि. १० : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीत ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील ६ लाख ८० हजार ७८६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक केले असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९,५६९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

६ जून २०२६ पासून नियमित दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला होता. या कालावधीत नवीन नोंदणी, प्रवेश अर्जाच्या भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

यामध्ये अमरावती विभागातील ६५,१५३, छत्रपती संभाजीनगर विभागातील ७६,३१८, कोल्हापूर विभागातील ६६,४८०, लातूर विभागातील ४०,७९२, मुंबई विभागातील १,७३,२२३, नागपूर विभागातील ५६,७७३, नाशिक विभागातील ८०,७३३, पुणे विभागातील १,१८,६१५ तसेच इतर २,६९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी (अलॉटमेंट) जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *