आंबेनळी घाट अपघात : मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

सातारा दि. 25 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात काल मध्यरात्री झालेला स्कॉर्पिओ गाडीचा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघातात  आठ युवकांचा मृत्यू झाला असून या घटनेवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तात्काळ सातारा आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बचावकार्याबाबत आणि पीडित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रायगड व सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड आणि पोलादपूर येथील ट्रेकर्स संस्थांसह स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारातच दरीत उतरून तात्काळ शोध व बचाव कार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून प्रशासकीय सोपस्कार गतिमान करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले आहेत.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचा क्रमांक MH 11 DN 2340 असा असून, यामध्ये एकूण आठ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, अवघड वळणावर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या अपघातामध्ये आसगाव ता. सातारा येथील चार, बोरगाव ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील एक, मर्ढे ता.जि. सातारा येथील दोन, खटाव ता. खटाव जि. सातारा येथील एक अशा आठ युवकांचा अपघातात मृत्यु झाला आहे. आम्ही या संपूर्ण घटनेवर आणि त्यानंतरच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवून आहेत. दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक माझ्या सतत संपर्कात आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण पाठीशी आहोत, अशा भावनाही  पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *