उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २४ : सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र, ज्या वेळी संधी उपलब्ध होतात, त्याच वेळी नवीन आव्हानेही समोर उभी राहतात. लॉजिस्टीक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचे असेल, तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गोंडखैरी येथे उभारण्यात आलेल्या गोदाम लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार डॉ. आशिष देशमुख, परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, कृष्णकुमार गुप्ता, हल्दीरामचे शिवकिसन अग्रवाल आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर व गडचिरोली भागातही आता उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे लॉजिस्टीक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टीक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ईलेक्ट्रिक वाहनामुळे लॉजिस्टिक्सवरील खर्च कमी होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मालवाहतुकीत ईलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चाच्या बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

संचालक महावीर जैन यांनी आपल्या प्रास्ताविकेत गोदाम लॉजिस्टिक्स पार्कबाबत माहिती दिली. राजन अग्रवाल यांनी आभार मानले.

असा आहे हा पार्क

दरम्यान, मध्य भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक औद्योगिक लॉजिस्टिक्स पार्कपैकी एक असा हा पार्क तब्बल 25 लाख चौरस फुटाच्या दर्जेदार ‘वर्ग अ’ गोदाम क्षमतेसह सुमारे 105 एकर जागेत उभारण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे  संचालित स्मार्ट वेअर हाऊसिंगची अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पात समाविष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात सुमारे 15 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 आणि समृद्धी महामार्गाशी धोरणात्मकदृष्ट्या जोडण्यात आलेला असा हा महत्त्वाचा लॉजिस्टिक प्रकल्प आहे. या प्रकल्पात सुमारे सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून प्रकल्पात सौर उर्जा संयंत्राचा समावेश करण्यात आला आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *