हतनूर धरणाच्या पुनर्वसनातील प्रलंबित कामे गतीने पूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ०७ : जळगांव जिल्ह्यासाठी तापी नदीवरील हतनूर प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र प्रकल्पातील गाळामुळे बॅकवॉटर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या पुनर्वसनातील प्रलंबित असलेली कामे गतीने पूर्ण करावी, तसेच नदीकाठावरील नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करावे, असे निर्देश जलसंपदा (तापी, विदर्भ व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मंत्रालयात हतनूर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील अडचणी सोडविण्याबाबत बैठक झाली. त्यावेळी आढावा घेताना मंत्री महाजन बोलत होते. बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार उमेश यावलीकर, आमदार चंद्रकांत सोनावणे, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य अभियंता राजेश मोरे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, हतनूर धरणाच्या पुनर्वसनातील राहिलेल्या घरांबाबत पुन्हा सर्वेक्षण करावे. पुर्नवसनापासून कुणीही वंचित राहू नये. तसेच गोळे समितीच्या अहवालानुसार बाधीत नागरिकांचे तातडीने पुनर्वसित गावठाणात स्थलांतर करावे. या प्रकल्पाबाबत सर्वंकष सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करावा. रावेर तालुक्यातील कांडवेल, मांगलवाडी, मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसावंगी, अंतुर्ली, मेंढोदे, मेहूण, धामंदे आदी गावांतील नागरी सुविधांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील म्हणाले, नागरी सुविधांच्या कामांसाठी प्रस्ताव सादर करावे. याकरिता लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

०००

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *