मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय क्रीडा संकुल आणि ‘मेयो’ला भेट व पाहणी

नागपूर, दि. २ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकामाचा प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.

सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो)  येथील विकासकामांची पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी,  महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर,  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शल्यचिकित्साशास्त्र विभाग, नेत्र विभाग यांच्या मॅाड्युलर ओ.टी., सिकलसेल व थॅलेसेमिया कक्षाची पाहणी केली. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार असून या इमारतीला भेट देत त्यांनी पाहणी केली. रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा व शिक्षण मिळाले पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे.  विशेषतः मेयो रुग्णालयातील वसतीगृहाचे सुरू असलेल्या बांधकामाकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना पाहणीदरम्यान दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय इमारत येथील ॲडव्हान्स लॅब, रुग्ण नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या निवा-याला भेट देत पाहणी केली.

क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या स्पोर्ट हबच्या विविध विकास विकासकामांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी देशातील सर्वोत्तम दर्जाच्या क्रीडा संकुलाअंतर्गत स्पोर्ट हबची निर्मिती व्हावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक आदी यावेळी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *