विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत मार्च २७ पर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रीन, उष्णतामान रोधक व पर्यावरणस्नेही इमारत

नागपूर, दि.२: जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालयांसाठी 12 मजली सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत बांधण्यात येत असून, या इमारतीचे बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनासोबतच वृक्षारोपण व ग्रीन बिल्डिंगची संकल्पना प्राधान्याने राबवा, या इमारतीचे बांधकाम अत्यंत उच्च दर्जाचे असावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत म्हणजेच मार्च 27 पर्यंत पूर्ण करा. यासाठी आवश्यक असलेला शंभर कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सुमारे तीन एकर जागेवर १२ मजली सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त इमारतीचे बांधकाम सुरू असून, या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली.  तसेच इमारतीच्या बांधकामा संदर्भात माहिती घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता ऋतुजा वंजारी, संतोष जाधव, कंत्राटदार विलास बिदारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या इमारतीचे बांधकाम करण्यात येत असून या इमारतीसाठी 271 कोटी 34 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सुमारे 32867km² चटई क्षेत्र असलेली ही इमारत 12 मजली असून, संपूर्ण इमारत ग्रीन बिल्डिंग म्हणून तयार करण्यात येत असल्यामुळे 125 किलो वॅट सोलरची सुविधा आहे. येथील उन्हाळ्यातही या इमारतीमध्ये उष्णता रोधक व्यवस्था राहणार आहे. या इमारतीमध्ये दोन टॉवर असून, स्वतंत्र वाहन तळ, 500 क्षमतेचे सभा कक्ष, कॉन्फरन्स हॉल आणि संपूर्ण इमारत वातानुकूलित असल्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही. या इमारतीसाठी आठ लिफ्ट असून जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय तसेच संबंधित शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या इमारतीच्या बांधकामा अंतर्गत येणाऱ्या वृक्षांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथील वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असून, 2000 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. ही इमारत मार्च 27 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या इमारतीच्या बेसमेंट व पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून दिलेल्या वेळेत ही इमारत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी दिली. या इमारतीसाठी निधी उपलब्ध असला तरी अंतिम टप्प्यात लागणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या निधी संदर्भात यावेळी त्यांनी माहिती दिली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *