छत्रपती संभाजीनगर, दि. २१ (विमाका) : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.
विभागीय आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील जिल्हानिहाय मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम., कर्नल नंदकिशोर खडसे, अपर आयुक्त रिता मेत्रेवार, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने , सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रभारी सहायक आयु्क्त (महसूल) सरिता सुत्रावे, उपायुक्त (पुरवठा) सुधाकर पवार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच बैठकीस विभागातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी नालेसफाईची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष
नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढविणे, पूरस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी सुरक्षित ठिकाणांची तयारी ठेवणे तसेच बचाव पथकांना सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पूरप्रवण गावांची अद्ययावत यादी तयार ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुन्या व धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
रस्ते, पूल आणि जलनिस्सारण यंत्रणा दुरुस्त करा
पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणारे रस्ते, पूल यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. संवेदनशील ठिकाणी सूचना फलक लावणे, वाहतूक नियंत्रण व्यवस्था करणे आणि जलनिस्सारण यंत्रणा कार्यक्षम ठेवण्याबाबतच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत
वादळी वाऱ्यामुळे किंवा मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी विद्युत यंत्रणांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, ट्रान्सफॉर्मर व वीजवाहिन्यांची दुरुस्ती तसेच तातडीच्या दुरुस्तीसाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले.
आरोग्य विभागाला विशेष सूचना
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधसाठा उपलब्ध ठेवावा. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालये येथे आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य मोहीम राबवा, असे निर्देश देण्यात आले.
२४x७ नियंत्रण कक्ष व आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवा
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २४x७ नियंत्रण कक्ष आणि १०७७ टोल फ्री सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून मॉक ड्रिल घेण्याचे निर्देशही देण्यात आले. पूरप्रवण गावांसाठी स्थलांतर योजना, सुरक्षित स्थळे, धान्यसाठा तसेच शोध व बचाव साहित्य सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले.
दामिनी व सचेत अॅपद्वारे जनजागृती
विज पडण्याच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘दामिनी’ व ‘सचेत’ अॅपचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. आपत्तीग्रस्त भागात कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रण, मदत छावण्यांची सुरक्षा व्यवस्था आणि तातडीच्या प्रतिसादासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स सज्ज ठेवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या.
शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित मार्गदर्शन
कृषी विभागामार्फत हवामान आधारित पीक नियोजन मार्गदर्शन, पर्जन्यमापक यंत्रांची तपासणी आणि शेतकरी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच विजेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यासोबतच पशुसंवर्धन विभागाने जखमी जनावरांवर तातडीने उपचार, लसीकरण आणि पशुखाद्य उपलब्ध ठेवावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जलसंपदा विभागामार्फत धरणातील पाणीपातळी व विसर्गाचे सतत निरीक्षण केले जाणार असून पूरपूर्व सूचना प्रणाली कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पुलांवर धोका पातळी चिन्हांकित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
मान्सून काळात सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास आपत्तीजन्य परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल. नागरिकांना वेळेवर मदत आणि सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावेळी आर्मीचे कर्नल नंदकिशोर खडसे यांनी आपत्तीच्या कालावधीत आर्मीकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच बचाव यंत्रणेबाबत माहिती दिली.
००००