लोककला अनुदान योजनेत आता नमन खेळे, जाखडी, वहीगायनसह झाडीपट्टीला अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ८: राज्यातील लोककलांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने लोककला अनुदान योजनेत आता ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या चार लोककलांचा समावेश केला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत केलेल्या निवेदनात मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले, नमन खेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
मंत्री शेलार म्हणाले, महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा लाभला असून, लोककलांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधनाचेही प्रभावी कार्य केले जाते. अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ जपणारी ही लोकसंस्कृती राज्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोककला प्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाकडून लोककला महोत्सव आयोजित केले जातात तसेच कलापथकांना भांडवली आणि प्रयोगात्मक अनुदानही दिले जाते. २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना अनुदान दिले जात असून, आता त्यामध्ये आणखी चार लोककला प्रकारांचा समावेश करण्यात आला असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये सुमारे १३० वर्षांची परंपरा लाभलेल्या झाडीपट्टी रंगभूमी, खान्देशातील धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांतील लोकप्रिय वहीगायन तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नमन खेळे आणि जाखडी या लोककलांना या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार आहे. वर्षानुवर्षे पदरमोड करून या लोककला जपणाऱ्या कलाकारांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील दुर्लक्षित लोककलांच्या संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच कलाकारांना आर्थिक आधार मिळणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
००००
एकनाथ पोवार/स.सं