‘सुमन सुगंध’ मधून स्वरसम्राज्ञी दिवंगत सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना भावपूर्ण स्वरांजली

मुंबई, दि. ८ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण दिवंगत सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर मराठी व हिंदी गीतांना अभिवादन करणारा ‘सुमन सुगंध – स्वर्गीय सुमन कल्याणपूर संगीत रजनी’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम विलेपार्ले (पूर्व) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रमोद जठार, गायक पद्मश्री सुरेश वाडकर, गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, कल्याणपूर यांच्या कन्या चारुल अग्नी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत सुमन कल्याणपूर यांच्या भारतीय चित्रपटसंगीतातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. त्यांच्या स्वरातील माधुर्य, शब्दोच्चारातील नितळता आणि भावस्पर्शी अभिव्यक्तीमुळे त्यांनी संगीतविश्वावर अमिट ठसा उमटविल्याचे मान्यवरांनी नमूद केले. त्यांच्या गायकीत भैरवी आणि अभोगी कानडा या रागांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबिंब जाणवत असल्याचाही उल्लेख करण्यात आला.

या संगीत मैफलीत दिवंगत सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गायिका अर्चना गोरे, मंदार आपटे, प्राजक्ता रानडे, माधुरी करमरकर आणि विद्या करलगीकर यांनी अजरामर गीतांद्वारे भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली. लोकप्रिय गायिका वैशाली सामंत तसेच संगीतकार व गायक अजित परब यांनीही आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमाची संहिता व सुसंवाद ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार मंगला खाडीलकर यांनी प्रभावीपणे साधला. पूजा पंत आणि त्यांच्या शिष्या यांच्या आकर्षक नृत्याविष्काराने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

हा कार्यक्रम मंत्री ॲड. शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, तसेच अभिजात कलावंतांचे अमूल्य योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असून, ‘सुमन सुगंध’ हा कार्यक्रम त्या उपक्रमांतील आणखी एक संस्मरणीय सांगीतिक सोहळा ठरला.

०००

संजय ओरके/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *