पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे – मंत्री दादाजी भुसे

अमरावती, दि. १५: विद्यार्थी भविष्यातील देशाचे सुजाण नागरिक आहेत. दैनंदिन जीवनात इतर गोष्टींमध्ये तडजोड करा. मात्र, पाल्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड न करता पालकांनी त्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. जिल्हा परिषद कन्या शाळेला सुविधांसाठी शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगत प्रत्येक वर्गात गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाख रुपयांचा निधीही त्यांनी शाळेसाठी जाहीर केला.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण आंधळे, आदी. यावेळी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, या शाळेत गुणात्मक शिक्षणासह मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात व सैनिकी प्रशिक्षणही दिले जात असल्याची बाब कौतुकास्पद आहे. मुलींच्या कला व क्रीडा गुणांनाही प्राधान्य देण्यात येत आहे, ही समाधानाची बाब आहे. शाळा  व शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. यासोबतच शाळेतील अन्य आवश्यक सुविधांसाठी शासनातर्फे पूर्ण मदत करण्यात येईल. शाळांमधून चांगले संस्कार व गुणात्मक शिक्षण मिळते व यातूनच देशाचे सुजाण नागरिक घडतात. म्हणून पालकांनी कोणतीही तडजोड न करता पाल्यांना शिकवावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही चांगला अभ्यास करून आई-वडील, गुरुजन, कुटूंब, गाव, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेशही त्यांनी दिला. कन्या शाळेतील गुणवंत विद्यार्थिंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

तत्पूर्वी, विद्यार्थींनी ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’, ‘मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन’, अशा देशभक्ती गींतावर सुंदर कवायती सादर केल्या.

विविध परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या श्रावणी सोनोने, जाणीव नंदेश्वर, अंतरा वाट, अनुष्का सूर्यवंशी या विद्यार्थिनींचा यावेळी मंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गजानन पवार, सुदाम वानखडे आणि श्रीराम मकेश्वर या माजी सैनिकांचा तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांचाही सत्कार करण्यात आला. वंदे मातरम व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *