‘तिसरी मुंबई’ सह वाढवण बंदर, रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा
नवी मुंबई, दि. १५ (विमाका): स्वातंत्र्याचा अमृतकाळ पार करत विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असून विकसित भारताच्या संकल्पातून प्रगत महाराष्ट्र घडविताना कोकण विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘तिसरी मुंबई’, वाढवण बंदर, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, आधुनिक पायाभूत सुविधा आणि स्थानिक कृषी व पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. हा विकास स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, मच्छीमार, महिला, युवक आणि पर्यावरणाचे हित केंद्रस्थानी ठेवून शाश्वत पद्धतीने करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
???????????
८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, विभागीय अपर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
???????????
स्वातंत्र्याचा संदेश आणि विकसित भारताचा संकल्प
मंत्री तटकरे म्हणाल्या, स्वातंत्र्य दिन हा केवळ राष्ट्रध्वजाला सलाम करण्याचा दिवस नसून, देशाच्या विकासासाठी आपली जबाबदारी अधोरेखित करणारा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे हे लोकशाहीचे सामर्थ्य आहे.
???????????
विकसित महाराष्ट्रासाठी सर्वांगीण विकास
पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योग, स्टार्टअप, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवी उंची देण्यास शासन कटिबद्ध आहे. आर्थिक विकासासोबत सामाजिक न्याय, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘तिसरी मुंबई’मुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा
मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि मुंबई महानगर प्रदेशाशी जोडलेल्या विकासामुळे कोकणाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. रायगड-पेण ग्रोथ सेंटरमधून उद्योग, तंत्रज्ञान, फिनटेक, डेटा सेंटर आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.
स्थानिकांच्या हिताला प्राधान्य
मोठ्या विकास प्रकल्पांमध्ये भूमिपुत्र, शेतकरी, मच्छीमार, महिला, युवक आणि पर्यावरणाचे हित केंद्रस्थानी ठेवण्यात येईल. स्थानिकांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.
महिला सक्षमीकरणाला चालना
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, स्वयंरोजगार, कौशल्यविकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिलांना विकासाच्या प्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनविण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण, आरोग्य आणि समान संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अनाथ, निराधार, दिव्यांग आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुनर्वसनासाठी वाढीव आर्थिक मदत
अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत निर्दोष मुक्त झालेल्या, मात्र किमान एक वर्ष कारावासात राहिलेल्या बंद्यांच्या पुनर्वसनासाठी सहाय्यक अनुदान २५ हजारांवरून ५० हजार रुपये करण्यात आले आहे. समुपदेशन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबतही शासन सकारात्मक आहे. कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या माध्यमातून कोकणातील युवकांना सक्षम करण्यावर भर आहे. युवकांनी रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे बनावे, अशी अपेक्षाही मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आंबा, काजू आणि सुपारीला मूल्यवर्धनाची जोड
हापूस आंबा, काजू आणि सुपारीला आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग, बाजारपेठ आणि निर्यातीशी जोडण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे सांगत वाढवण बंदरामुळे आयात-निर्यात व्यापाराला चालना मिळण्यासोबत उद्योग, वाहतूक, सेवा आणि रोजगाराच्या संधी वाढतील. स्थानिक युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर असल्याचेही त्या म्हणाल्या.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे दळणवळणाला गती
रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे कोकणातील संपर्क सुलभ होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल. पर्यटन, व्यापार आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला याचा फायदा होणार आहे. तसेच मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत स्थानिक कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचे हित जपून कोकणचा शाश्वत विकास साधण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री तटकरे यांनी यावेळी दिली.
जलसंधारण सप्ताहात सहभागी व्हा
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. आजपासून जलसंधारण सप्ताह सुरू झाला असून २१ ऑगस्टच्या महा वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत शुभेच्छा संदेश फलक लावून स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती.
यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस सेवा तसेच विविध शासकीय विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर मंत्री तटकरे यांनी उपस्थित नागरिक,अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेत त्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.
कार्यक्रमास नवी मुंबई पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, नवी मुंबई पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी-उंटवाल, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, सह आयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, सह आयुक्त (रोहयो) संदीप पवार, अपर आयुक्त (विकास आस्थापना) मिनल कुटे, उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभवी, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००