निरोगी नागरिक सशक्त महाराष्ट्र आणि मजबूत राष्ट्र घडवतील –  मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ७ : ‘आरोग्य हेच आपले खरे धन आहे. निरोगी नागरिकांमुळे सशक्त महाराष्ट्र आणि मजबूत राष्ट्र उभे राहू शकेल,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्रालय येथील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित जागतिक आरोग्य दिनानिमित्त फिट (FIT) महाराष्ट्र आरोग्य अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सध्या मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम, निरामय जीवनशैली, संतुलित आहार, ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी या गोष्टी निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊन लठ्ठपणा कमी करण्यावर आणि योग्य आहारावर विशेष भर द्यावा, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.

डॉ. मंगेश तिवस्कर यांनी  म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर — विशेषतः, स्थूलता, मधुमेह, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याबाबत जनजागृती निर्माण करणे हा “फिट महाराष्ट्र मुव्हमेंट” या मोहिमेचा मुख्य उद्देश असून राज्यातील नागरिकांना आरोग्याबाबत अधिक जागरूक करण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. या उपक्रमामुळे  नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढून निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल होईल.

दि.७ व ८ एप्रिल रोजी मंत्रालयातील कर्मचारी यांच्यासाठी बॉडी कॅम्पोझिशन ॲनालयझर (बीसीए) द्वारे आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन यावेळी करण्यात आले.

०००

मोहिनी राणे/स.सं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *