मुंबई, दि.७: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या ‘पाईप कन्व्हेअर बेल्ट’सह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज दिली.
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या पाईप कन्व्हेअर बेल्ट परिसरात ५ मे २०२६ रोजी आग लागण्याची घटना घडली होती. ही आग कन्व्हेअर बेल्टच्या लोडिंग अथवा अनलोडिंग भागात लागलेली नव्हती. कन्व्हेअर बेल्ट ज्या भागातून जातो, त्या परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. शेतातील अवशेष जाळल्यामुळे लागलेल्या आगीचा परिणाम कन्व्हेअर बेल्ट परिसरावर झाला आणि त्यातून ही घटना घडली. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून आग तातडीने नियंत्रणात आणण्यात यश आले होते. आपत्कालीन प्रतिसाद पथकही अपेक्षित वेळेत घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
सदर प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्या परिसरातील नागरिकांमध्ये गवत व पीक अवशेष उघड्यावर न जाळण्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार जनजागृती करण्यात येईल. त्याचबरोबर जुन्या झालेल्या पायाभूत सुविधा व यंत्रणांचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी डीपीआर तयार करून टप्प्याटप्प्याने नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
००००
बी.सी.झंवर/विसंअ