नांदेड – मुंबई व टनकपूर – नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा

दि.०६ जुलै २०२६: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई व टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले.
या निमित्ताने नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. टनकपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, अजय टम्टा तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पिलीभीत येथे केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद व इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. कविता संतोष मुळे, खासदार मा. डॉ. अजित माधवराव गोपछडे, खासदार मा. श्री. रवींद्र वसंतराव चव्हाण, खासदार मा. बळवंत बसवंत वानखेडे, विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ अनंतराव राजूरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. संजय कुमार श्रीवास्तव, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले तसेच इतर रेल्वे अधिकारीही या कार्यक्रमास उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षांची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करेल तसेच नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि बसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत भारतीय रेल्वेने केलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या कालावधीत 37,000 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून रेल्वे जाळ्याचे 99.6 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच समर्पित मालवाहतूक मार्ग (Dedicated Freight Corridors) वेगाने प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारा व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये सातत्याने नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी जून महिन्यापर्यंत उन्हाळी हंगामात 15,000 हून अधिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान सुमारे 12,000 विशेष गाड्या चालविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नवीन रेल्वे सेवांच्या प्रारंभाबद्दल जनतेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील विशेषतः बसमत,  हिंगोली, वाशीम, अकोला आणि नांदेड जिल्ह्यांतील प्रवाशांना मुंबईसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क उपलब्ध होईल. तसेच टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे उत्तराखंड व उत्तर प्रदेशातील भाविकांना नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वाराला जाणे अधिक सुलभ होईल.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला चालना मिळून उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. ही नवीन रेल्वे सेवा महत्त्वाच्या स्थळांमधील संपर्क अधिक सक्षम करेल, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून या नवीन रेल्वे सेवा सुरू केल्याबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड आणि नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील तसेच या भागातील जनतेला अधिक चांगली संपर्क सुविधा उपलब्ध होईल.

नांदेड रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण यांनी सांगितले की, या दोन नवीन रेल्वे सेवांमुळे नांदेड आणि मराठवाड्याचा देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. गेल्या काही वर्षांत लोकांच्या सहकार्यामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे नांदेड परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी सांगितले की, नांदेड–मुंबई एक्सप्रेस विद्यार्थी, भाविक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील प्रवाशांसाठी विशेषतः लाभदायक ठरेल. या नवीन रेल्वे सेवांमुळे परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. अजित माधवराव गोपछडे यांनी मा. पंतप्रधान आणि मा. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे नांदेड–मुंबई व टनकपूर–नांदेड या नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू केल्याबद्दल आभार मानले. या गाड्यांमुळे नांदेडचा महाराष्ट्रातील तसेच उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांशी संपर्क अधिक सुदृढ होईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी सांगितले की, नांदेड–मुंबई आणि नांदेड–टनकपूर एक्सप्रेसमुळे नांदेडचा संपर्क आणि पर्यटनाला अधिक चालना मिळेल. नांदेड हे हैदराबाद, मुंबई आणि नागपूर यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी रेल्वे सेवा सुरू करण्याची त्यांनी मागणी केली.
यापूर्वी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी स्वागतपर भाषण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *