कातकरी समाजातील सपना वाघमारे ठरणार उच्च शिक्षणाची प्रेरणा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ९ : दुर्गम आणि वंचित भागातील मुलींनी उच्च शिक्षणासाठी कातकरी समाजातील सपना चंद्रभागा राजेश वाघमारे हिच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि समाजातील रूढ परंपरांना छेद देत सपना हिने लंडनमधील विद्यापीठात एलएलएम (मास्टर ऑफ लॉ) शिक्षणासाठी पात्रता प्राप्त केली असून, तिच्या उच्च शिक्षणासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मंत्री तटकरे यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात सपना वाघमारे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शिक्षणाची समान संधी हे मूलभूत हक्क संविधानाने बहाल केले आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर असल्या तरीही दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना ऊसतोडणी किंवा कोळसा प्रकल्पांमध्ये कामासाठी सतत स्थलांतर करावे लागत असल्याने मुलींचे शिक्षण अनेकदा अपूर्ण राहते.

रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील सपना वाघमारे हिने समाजातील अल्पवयीन विवाहाच्या प्रथेला नकार देत शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. कायद्याचे शिक्षण घेऊन समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार तिने केला आहे. तिच्या या जिद्दीचे आणि इच्छाशक्तीचे मंत्री आदिती  तटकरे यांनी विशेष कौतुक केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सपना हिला परदेशी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी तसेच तिच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. कातकरी समाजातील मुलींसाठी तिचे यश प्रेरणादायी असून, शिक्षणाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, याचे ती उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलेल्या सपना वाघमारे हिने सांगितले की, आदिवासी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. कामानिमित्त स्थलांतर करावे लागत असल्याने अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते आणि त्यांना लवकर विवाह करावा लागतो. त्यामुळे अन्याय व अत्याचाराविरोधात त्यांना प्रभावीपणे आवाज उठवता येत नाही.

“मी त्यांच्यापैकीच एक आहे. कायद्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महिलांनी शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी व्हावे,” अशी भावना सपनाने व्यक्त केली.

शासकीय वनवासी कल्याण आश्रमशाळा येथे सपना हिने शिक्षण पूर्ण केले असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत तीला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

सपना हिचे शिक्षण तिचे मामा भिवा पवार आणि मामी ज्योत्स्ना पवार यांनी मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने शासकीय आश्रमशाळेत घेतले. तिचे आई-वडील ऊसतोडणी आणि कोळसा प्रकल्पांमध्ये मजुरीचे काम करतात. कातकरी समाजात मुलींचे अल्पवयात विवाह लावून देण्याची प्रथा असतानाही सपना हिने या रूढ चौकटी मोडून शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि आज उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळवली आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *