नवी दिल्ली, दि. १२ : निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात दि. 16 व 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि पारंपरिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रांगोळी कार्यशाळा, स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार श्री.गणेश खरे यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. संस्कार भारती, गालिचा, लॅंडस्केप, पोर्ट्रेट आणि पोस्टर रांगोळी अशा विविध शैलींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण सहभागी कलाकारांना देण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक रांगोळी कलेसोबत आधुनिक कलाशैलींची ओळख करून घेण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे.
कार्यशाळेसोबतच आकर्षक रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक स्पर्धकाला 3 बाय 3 फूट आकाराची स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक रांगोळी व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे अपेक्षित आहे. इच्छुकांना ऑन-द-स्पॉट सहभागाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध शैलींमध्ये साकारलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन दिवसभर नागरिकांसाठी खुले राहणार असून, महाराष्ट्राच्या या वैशिष्ट्यपूर्ण लोककलेचा अनुभव घेण्याची संधी दिल्लीकरांना मिळणार आहे. या सांस्कृतिक उपक्रमाच्या पुढील टप्प्यात सोमवार, दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘चतुरंग’ या विशेष सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे विविध कलाविष्कार सादर केले जाणार आहेत. दिल्ली-एनसीआरमधील रांगोळी कलाकार, विद्यार्थी, कलाप्रेमी तसेच नागरिकांनी या अनोख्या सांस्कृतिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या समृद्ध कलावैभवाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले आहे.
0000