उमेदच्या महिला बचतगटांच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी – निलेश सागर

मुंबई दि. २८: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एपिडा (APEDA) आणि एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त पुढाकारातून आज पंढरपूर तालुक्यातील शिवस्वराज शेतकरी महिला उत्पादक कंपनीचा शेवगा दुबई ला निर्यात झाला, त्याचा आज शुभारंभ कार्यक्रम कंटेनर ला अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला.
या कार्यक्रमासाठी उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, अतिरिक्त संचालक परमेश्वर राउत, एपिडा चे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक मंजिरी टकले, संदीप जठार, एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे चेअरमन प्रवीण वानखडे शिवस्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्ष व सर्व संचालक मंडळातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी निलेश सागर म्हणाले, “अभियानाच्या दृष्टीने आजचा दिवस मैलाचा दगड ठरणारा आहे, उमेद अभियानाच्या अंतर्गत कार्यरत महिलांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी आमची यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे, एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या मदतीने आणि एपिडा (APEDA) यांच्या मदतीने आज पहिला कंटेनर दुबईला जात आहे. दर्जेदार शेवग्याचे उत्पादन महिलांनी केल्यामुळे त्यांचा शेवगा आज निर्यात होत आहे. यापुढे राज्यभरातील महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील राहील. शेतमाल निर्यात करण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर कोल्ड स्टोरेज ची व्यवस्था मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे वेगवेगळ्या विभागासोबत समन्वय करण्यात येईल” असे श्री सागर यांनी सांगितले.
अभियानाचे अतिरिक्त संचालक यांनी उमेद्च्या महिलांचा शेतमाल निर्यात होण्याच्या अनेक शक्यता असून खरेदीदार आणि महिला यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात येईल. आजच्या या उदाहरणामुळे राज्यभरातील ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. उमेद अभियानाच्या गरिबी निर्मूलनाच्या उद्दिष्टातून लखपती दीदी घडविण्याच्या प्रक्रियेचा आजचा टप्पा अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
एपिडा चे उप महा व्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी त्यांच्या विभागाकडून उमेद अंतर्गत ग्रामीण महिलांचा शेतमाल निर्यात होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातील ग्रामीण महिलांना त्यांच्या हक्काची अंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यापुढेही मदत सुरु राहील असे सांगितले
एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे चेअरमन प्रवीण वानखडे यांनी राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात शेतमाल बाहेरच्या देशात पाठविता येईल मात्र त्यासाठी शेतीमालाचा  दर्जा सुद्धा सर्वोत्तम असावा लागेल. भारतातील शेतीमालाला चांगली मागणी आहे,त्यासाठी चांगले निर्यातदार भेटणे आवशक आहे, या प्रकारचे निर्यातदार उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवस्वराज्य शेतकरी महिला उत्पादक गटाच्या अध्यक्ष श्रीमती कौशल्य शंकर जाधव म्हणाल्या की,आमच्या शेवग्याचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे आमच्या सर्व महिलांना खूप आनंद होत आहे, आम्ही आता आमच्या भागातील महिलांना निर्यात होऊ शकणाऱ्या शेती उत्पादनाचा आग्रह करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *