आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा
जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा

 

नंदुरबार, दि. 14 : “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आदिवासीबहुल जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राधान्याने विकास करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. या प्रयत्नांत जिल्ह्यातील सर्व घटकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

नवापूर येथील शेठ एच. जे. शहा कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी 11.30 वाजता आयोजित शासनाच्या विविध विभागांच्या विकास योजनांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार शिरीष नाईक, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, परिविक्षाधीन सनदी अधिकारी श्री.पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, प्रतिभा शिंदे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर महिन्याला एका तालुक्याचा आढावा

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारून आता चौथा महिना सुरू झाला आहे. जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि विकासात्मक परिस्थिती प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात न चुकता जिल्ह्यात येऊन एका तालुक्याचा सविस्तर आढावा घेण्याचा शब्द आपण दिला होता. त्यानुसार शहादा तालुक्यानंतर आता नवापूर तालुक्याचा आढावा घेण्यात आला आहे.

नंदुरबार हा दुर्गम, आदिवासीबहुल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मोठी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. भौगोलिक प्रतिकूलतेमुळे येथील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात चांगली आणि दर्जेदार विकासकामे व्हावीत, हाच तालुकानिहाय आढावा बैठकांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य

आरोग्य, शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते आणि दळणवळण या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणावर सर्व विभागांनी विशेष लक्ष केंद्रित करावे. पालकमंत्री म्हणून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर योग्य आणि लोकहिताच्या कामांसाठी करून त्याचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचेल, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

शेत-पाणंद रस्त्यांसाठी 1,600 प्रस्ताव

बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार  दत्ता जाधव यांनी महसूल विभागाचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेसाठी तालुक्यातून 1,600 प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जुलैअखेरपर्यंतचे सर्व अर्थसहाय्य संबंधित लाभार्थ्यांना अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जलजीवन मिशनच्या कामांत तडजोड नाही

गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी ग्रामविकास विभागाचा आढावा सादर केला. यामध्ये विविध घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयांची कामे आणि रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कठोर भूमिका घेत या कामकाजाच्या कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगितले. नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रलंबित कामे दर्जेदार पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शिक्षणासह विविध विभागांचा आढावा

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या विविध योजना, शाळांची स्थिती आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा सादर केला. यासोबतच नवापूर नगरपालिकेचे कामकाज, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

कृषी विभागातील रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी ही पदे भरण्याबाबत मंत्री दत्तात्रय तथा दत्तामामा भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाची निधीअभावी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवापूर शहराच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रस्ताव द्या

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कामांचा आढावा घेताना नवापूर शहरातील वीजपुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला. नवापूर आणि विसरवाडी येथील रोहित्रांवरून आवश्यक जोडणी करण्यासंदर्भातील तांत्रिक प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली.

वनहक्क पट्टेधारकांना कर्ज उपलब्ध करून द्या

वनहक्क पट्टेधारक आदिवासी बांधवांना शेती आणि इतर आवश्यक उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व संबंधित सहकारी संस्था आणि बँकांना कर्जवितरणाबाबत आवश्यक सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नवापूरसाठी 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव

नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेताना रिक्त असलेल्या अस्थिरोग शल्यचिकित्सकाच्या (ऑर्थोपेडिक सर्जन) पदावर तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.

नवापूर येथे सध्या 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. वाढती लोकसंख्या आणि परिसरातील नागरिकांची आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन हे रुग्णालय 100 खाटांचे करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी आयोजित या बैठकीत पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयाने व परस्पर सहकार्याने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *