‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : मुंबईच्या विकासात ‘बेस्ट’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘बेस्ट’ ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बेस्ट’ प्रशासनाला केली. यासाठी शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांना उपदान (ग्रॅच्युइटी), कोविड भत्ता, कायमस्वरुपी तसेच हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र आदींच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह आमदार सर्वश्री ॲड. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ‘बेस्ट’ कामगारांच्या उपदानासाठीचा (ग्रॅच्युइटी) 332 कोटींचा तसेच कोविड भत्त्यापोटीचा 78 कोटींचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे कायमस्वरुपी कामगार आणि हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र, धाडसी कार्य करणाऱ्या कामगारांचा सत्कार, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईने 1873 मधील ट्राम सेवेपासून आजच्या ‘बेस्ट’ बस पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे परिवर्तन पाहिले आहे. मुंबईकरांना त्यांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचण्यासाठी एकाहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याने आता मेट्रोचे जाळे देखील विणले जात आहे. तथापि, ‘बेस्ट’ सेवेचे महत्त्व अबाधित असून तिला अधिक बळकट केले जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘बेस्ट’ कामगारांच्या जुन्या झालेल्या निवासी संकुलांच्या पुनर्विकासाबाबत तसेच ‘बेस्ट’च्या बळकटीकरणाला मदत होईल, अशा पद्धतीने बस डेपोच्या पुनर्विकासाबाबत देखील आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

प्रारंभी श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार श्री. लाड यांनी प्रास्ताविकात बेस्ट च्या कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले. आमदार सर्वश्री श्री.  शेलार, श्री. दरेकर यांनी देखील ‘बेस्ट’च्या कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. महाव्यवस्थापक श्री. डिग्गीकर यांनी आभार मानले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *