चिचपल्ली येथील नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि.२१- संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले.

श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *