मुंबई, दि.१६ : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ च्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून पंढरपूरकरिता आषाढी एकादशीनिमित्त सोडण्यात आलेली विशेष एक्स्प्रेस आज दुपारी रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी या रेल्वेला झेंडा दाखवत वारकऱ्यांना आषाढी यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, पंढरीच्या वारीला मोठा इतिहास आहे. मराठी मनाला आस लावणारी ही विठ्ठलाची वारी वारकऱ्यांसाठी आणि मराठी माणसासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. विठ्ठलाच्या वारीची आस असलेल्या मुंबईतील वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी विशेष एक्स्प्रेसची सोय करण्यात आली आहे.
पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक जातात. प्रत्येकाला मनोमन इच्छा असते की एकदा तरी वारीला जावे. मुंबईकरांनाही आपल्या धकाधकीच्या जीवनातून पंढरीला जाता यावे, यासाठी मुंबईतील विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी विशेष एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस आज दुपारी ३ वाजता सीएसएमटीहून पंढरपूरसाठी रवाना झाली. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूरहून मुंबईसाठी रेल्वे सुटेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
०००००
संध्या गरवारे/विसंअ