विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.२९ : अनादी काळापासून भारत साहित्य, तत्वज्ञान, संगीत, नृत्य कला व संस्कृतीची भूमी आहे. चौदा विद्या व चौसष्ट  कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे या देशात कार्यारंभी स्मरण केले जाते.  शाळा व महाविद्यालयांमध्ये कला, ललित कला व प्रदर्शन कलांचा अंतर्भाव केल्यास अध्ययन प्रक्रिया आनंददायक होईल तसेच विद्यार्थी संवेदनशील व तणावमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश यांनी आज येथे केले.

साहित्य, शिक्षण, कला, नृत्य व संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या  ‘वाग्धारा’ संस्थेतर्फे आयोजित वाग्धारा कला महोत्सवाचे उदघाटन’ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज मुक्ती सभागृह अंधेरी मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ कला व नाट्य दिग्दर्शक जयंत देशमुख, लेखक दिग्दर्शक रुमी जाफरी, वर्सोवा येथील चिल्ड्रेन वेल्फेअर स्कूलचे प्राचार्य अजय कौल, शिक्षणतज्ज्ञ प्रशांत काशीद, अभिनेत्री कंचन अवस्थी, अभिनेते रवी यादव, ‘जलयोग’ प्रचार – प्रसार कर्त्या डॉ. सविता राणी यांसह २७ लोकांना  ‘वाग्धारा राष्ट्र सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आले.

भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आपला वारसा असलेल्या योग, कला व संस्कृतीचा देखील प्रचार प्रसार केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

मुंबई ही कलानगरी असून देशभरातील गायक, गीतकार, संगीतकार, वादक, रंगकर्मी, अभिनेते व अभिनेत्री यांना या शहराने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

दूरचित्रवाणी सह, डिजिटल व समाज माध्यमांच्या आगमनामुळे अनेक लहान मोठ्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले असून  कला जगताचे लोकशाहीकरण झाले आहे असे निरीक्षण राज्यपालांनी नोंदवले.  राज्यातील विद्यापीठांतर्फे दरवर्षी आंतर विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ आयोजित केला जातो. त्यातून नवनवे कलाकार उदयाला येत आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. मुस्तफा युसूफ अली गोम यांनी लिहिलेल्या ‘नरेंद्र मोदी संवाद’ तसेच रुमी जाफरी यांनी लिहिलेल्या ‘भोपाल के टप्पे’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ वागीश सारस्वत यांनी प्रास्ताविक केले, तर जयंत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *