विकास कामांना प्राधान्य देऊन कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. २२ (जिमाका): जनतेला चांगल्या  सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकास कामे  केली जात आहेत. विकास कामे राबविताना वीज, पाणी, आरोग्य, रस्ते वाहतूक, कृषी विषयक सेवांबाबत यंत्रणांनी  अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले.

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाली. बैठकीस नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील व धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अरुण लाड, जयंत आसगावकर, विश्वजीत कदम, मानसिंग नाईक, सुधीर गाडगीळ,  सुमनताई पाटील, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सन्माननीय सदस्य व जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थितीत होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत.  विकास कामातून  जिल्ह्याचा विकासाचा वेगळा पॅटर्न तयार व्हावा.  विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले. जिल्ह्यात विविध यंत्रणामार्फत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती प्रतिनिधींना द्यावी. यंदाच्या  खरीप हंगामाचे कृषी विभागाने सुयोग्य नियोजन करावे.  हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध व्हावीत. बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत दिल्या. यावेळी खरीप हंगामासाठी बी बियाणे, रासायनिक खते उपलब्ध असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.

जत तालुक्यासाठी  कार्डियाक ॲम्बुलन्स मिळण्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तात्काळ पाठवावा. शेतीपंप वीज मीटर बदलण्याचे काम महावितरणने गतीने पूर्ण करावे. म्हैसाळ उपसा उपसा सिंचन योजना जमीन अधिग्रहण मोबदला संबधित शेतकऱ्यांना देण्यात यावा. सुखवाडी व तुंग दरम्यानच्या पुलाचे काम मुदतीत पूर्ण करावे. जत शहरासाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. खानापूर तालुक्यातील कमळापूर गावासाठी  असलेल्या स्मशान भुमिमधील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत. वन विभागाने त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक आठवड्यात ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. एस. टी. महामंडळाने बंद असलेल्या फेऱ्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या.

सन  २०२३-२०२४  मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून ४९० कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात आला. असून खर्चाची टक्केवारी  ९९.८५ % इतकी आहे. तर सन २०२४-२०२५ साठी ५७३ कोटीचा नियतव्यय मंजूर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. आज झालेल्या जिल्हा नियोजनच्या समितीत मिरज तालुक्यातील दुधगाव येथील संत बाळूमामा मंदिर, वाळवा तालुक्यातील  शिवपुरी येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर, शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द येथील वाकेश्वर मंदिर,  शिराळा खुर्द येथील जांभळाइडेवी मंदिर, पलूस तालुक्यातील अमनापुर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान, कवठेमंकाळ तालुक्यातील आगळगाव येथील श्री यल्लमादेवी मंदिर आणि जत तालुक्यातील  रामपूर येथील गावसिद्धेश्वर देवालय या यात्रास्थळांना क वर्ग तीर्थ स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली. या बरोबरच खानापूर येथे नवीन रामा केअर सेंटर बांधण्याच्या कामास आणि जत येथे ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय बांधणे याबाबतही मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले.  या बैठकीत दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *