निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे – जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव

मुंबई, दि.१४ : विधानपरिषदेच्या मुंबई  पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून 2024  रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 या वेळेत पार पडणार आहे. निवडणूक प्रशिक्षण घेताना निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून घेऊन दक्षतापूर्वक पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अशा मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिल्या.

मुंबई शिक्षक व पदवीधर विधानपरिषद  निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृहात निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण आज देण्यात आले.

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती अंशु सिन्हा (भाप्रसे) यांची तर शिक्षक मतदार संघासाठी डॉ. महेंद्र कल्याणकर (भाप्रसे) यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही निरीक्षकांनी  आज प्रशिक्षणस्थळी भेट देऊन  मार्गदर्शन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी  फरोग मुकादम आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून हिंदी, इंग्लिश आणि मराठी या  भाषेत प्रशिक्षण दिले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्यावेळी केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी पार पाडावयाची जबाबदारी, मतदान कक्षाची रचना कशी असेल, मतदान कक्षाचा प्रोटोकॉल कसा पाळावा, मतपेटीचा वापर कसा करावा, मतपत्रिका, शाईचा वापर, स्केच पेन उपयोग यांचा योग्य ठिकाणी कसा वापर करावा, मतदान  प्रक्रिया, मतदारांची कोणती ओळखपत्रे तपासण्यात यावीत, निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी  प्रात्यक्षिक  सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.  या प्रशिक्षणाला मुंबई उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्यामसुंदर सुरवसे, सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *