मुंबई, दि. १२ : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या पार्श्वभूमीवर मुद्रणालयांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) अन्वये नियमांचे पालन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) अन्वये मुद्रणालयांवर निवडणुकविषयी पत्रके, भित्तीपत्रके, फलक इत्यादींचे मुद्रण व प्रकाशन करणेबाबत निर्बंध लादण्यात आलेले आहेत. कलम १२७ ए मध्ये ‘मुद्रित करण्यात येणारी पत्रके यांच्या मुखपृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद करणे, प्रकाशकाकडून ओळखीबाबतचे घोषणापत्र घेणे, मुद्रित करण्यात आलेले पत्रक, फलक इ. यांची संख्या व त्यासाठी आकारण्यात आलेले शुल्क यांची माहिती सादर करणे आवश्यक असते. कलम १२७ ए मधील तरतूदींचा भंग केल्यास करण्यात येणारी कारवाई’ इ. बाबतच्या तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) मधील नमूद तरतुदी कार्यक्षेत्रातील राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांना निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील सर्व मुद्रणालयांनी कलम १२७ ए मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.
——000——-