ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात विविध सोयी सुविधा उपलब्ध – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. २० (जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील २३ भिंवडी, २४ कल्याण, २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघाच्या विविध मतदान केंद्रांवर २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात मिळून 6604 मतदान केंद्रे आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना सोईचे व्हावे, यासाठी सर्वच मतदान केंद्रे तळमजल्यावर आणली आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, फर्निचर व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक, मतदान केंद्रावर सावली, पाळणाघर, मार्गदर्शक फलक, मतदान सहाय्यता केंद्र, प्रथमोपचार पेटी, रांगेचे व्यवस्थापन आदी व्यवस्था जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.

मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी १:१२ उतार असलेला रॅम्प उभारण्यात आले आहे, जेणेकरुन जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल. मतदान केंद्रावर नळाचे शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 100 लिटर थंड पिण्याचे पाणी व पाणी पिण्यास पर्यावरण पूरक ग्लास ठेवण्यात येणार असून यासाठी एका स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे.

मतदान केंद्रावर महिला मतदार व पुरुष मतदार यांच्यासाठी स्वतंत्र, पक्के, स्वच्छ व पुरेशा  पाण्याची सोय असलेले स्वच्छतागृह उपलब्ध असणार आहेत. जेथे पक्क्या स्वरुपाचे स्वच्छतागृह उपलब्ध नसेल तेथे मोबाईल टॉयलेट व्हॅन संबंधित महानगरपालिका / नगरपालिका /नगरपरिषद यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी स्वच्छता कर्मचारी याठिकाणी उपस्थित असणार आहेत.

उमेदवार प्रतिनिधींसाठी त्याचबरोबर निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी पुरेशा प्रमाणात टेबल, खुर्च्या व रांगेतील उभा असणाऱ्या मतदारांना बसण्यासाठी मतदान केंद्रावर पुरेसे खुर्च्या / बाक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर पुरेशी प्रकाश व्यवस्था व पंखे उपलब्ध केले जाणार आहे तसेच मतदान केंद्रावरील वीज कनेक्शन सुरु असल्याबाबत खात्री करण्यात आली आहे.

मतदारांना मतदान केंद्र सापडावे, यासाठी किमान 4 दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. हे दिशादर्शक फलक संबंधित मतदान केंद्रात नोंदणी असलेल्या मतदार राहत असलेल्या ठिकाणी प्रमुख चौकात लावण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या ठिकाणाचा ले आऊट व सुविधा जसे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, मतदान सहाय्यता केंद्र असे फलक लावण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर रांगेतील उभ्या मतदारांना ऊन लागू नये यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघर असावे या उद्देशाने मतदान केंद्रावर मुलांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदारांच्या माहितीसाठी मतदार सहाय्यता केंद्र

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा यादीतील नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच कोणते मतदान केंद्र आहे हे कळावे यासाठी बीएलओ व त्याची टिम मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. मतदार सहाय्यता केंद्रातही पुरेशा प्रमाणात सुविधा देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रावर पुरेश्या औषध साठ्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सध्या उष्णतेची लाट असल्याने पुरेसे ओआरएस (ORS) व ग्लुकोज (Glucose) पावडर याठिकाणी उपलब्ध असणार आहे. तसेच हिट स्ट्रोक (Heat stroke) टाळण्यासाठी काय करावे, याचे माहितीपत्रक सर्व निवडणूक विषयक कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. सेक्टर ऑफिसर सोबतही एक आरोग्य कर्मचारी, प्रथमोपचार पेटी (Medical Kit) सह उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात प्रत्येक एक तासांनी प्रत्येक मतदार केंद्रावर पोहचेल, अश्या पध्दतीने एक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

मतदारांना सोबत डोक्यावर ओला रुमाल, कपडा आणण्यासाठी व शक्यतो लहान मुलांना सोबत घेऊन येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *