लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार

मुंबई, दि.१०: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पाचव्या टप्प्याच्या  अनुषंगाने निवडणूक प्रशासनाने काटेकोरपणे तयारी करावी. पाचव्या टप्प्यात  मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश भारत निवडणूक आयोगाचे  निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार यांनी आज दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पाचव्या टप्प्यातील तयारी संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व  निवडणूक निरिक्षकांच्या बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.  या बैठकीत आढावा घेताना हिर्देश कुमार बोलत होते.

बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमंत कुमार, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव अनिल कुमार, भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले महाराष्ट्र राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक  धर्मेंद्र एस गंगवार, विशेष निवडणूक  पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा, राज्य पोलीस समन्वय अधिकारी तथा विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके उपस्थित होते.

उपआयुक्त श्री. कुमार म्हणाले की, राज्यात आतापर्यंत २४ मतदारसंघासाठी मतदान झालेले आहे. या निवडणुका सुरळीतपणे  पार पडल्या आहेत. येणाऱ्या पाचव्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात  मतदानाची टक्केवारी  जास्तीत जास्त  वाढण्यासाठी यंत्रणेने समन्वयाने प्रयत्न करावेत.          श्री. कुमार पुढे म्हणाले, अधिक ‘पोलिंग बूथ’ असलेल्या मतदान केंद्रांवर मतदार यादी मध्ये नाव शोधणे, मतदान केंद्र दाखविणे यासाठी मतदार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात यावी. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था असावी. ज्यामुळे मतदान टक्का वाढण्यास मदत होईल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर उन्हापासून बचाव करण्याच्या सुविधा देण्यात याव्यात.

महाराष्ट्र राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार यांनी मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निवडणूकीच्या अनुषंगाने  प्रशासनाची तयारी, मतदानासाठी होणाऱ्या लांब रांगा असतील तर या दिवशी घेण्यात येणारी खबरदारी, मतदान करताना मतदारांना मार्गदर्शन करण्याच्या  सूचना दिल्या.

विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा म्हणाले की, पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळताना कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत. याबाबत मार्गदर्शक तत्वे भारत निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहेत. मतदारांना मतदान केंद्र कुठे याची माहिती होण्यासाठी संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावा. समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज अथवा काही अनुचित मजकूर प्रसारित होत असल्यास तत्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी  दिल्या.

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली निवडणुकीची तयारी, निवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम  यांनी सादरीकरणाव्दारे निवडणूक तयारीची माहिती दिली.

या बैठकीसाठी पाचव्या टप्प्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, ठाणे महापालिकाचे आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिकेचे  कैलाश शिंदे, पालघरचे जिल्हा निवडणूक अधिकारी  गोविंद बोडके, ठाणेचे अशोक शिनगारे, मुंबई शहरचे संजय यादव, मुंबई उपनगरचे राजेंद्र क्षीरसागर, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसळकर, ठाणेचे पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मिरा – भाईंदर  आणि वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निरीक्षक यांनी विविध सूचना केल्या. महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशी प्रशासनाने केलेल्या तयारी बाबतची माहिती सादर केली.

नाशिकचे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, धुळे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, तसेच केंद्रीय निरीक्षक  दूर दृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

0000

निलेश तायडे/वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *