मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान केंद्र पातळीवर गृहभेटीवर देण्यात येतोय भर

धुळे, दि. ४ मे, २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ०२-धुळे लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता मतदान केंद्राच्या क्षेत्रात गृहभेटी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत आज धुळे तालुक्यातील वडगाव येथे निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेट देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी गृहभेटी उपक्रम राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी विशाल नरवाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, तहसिलदार अरुण शेवाळे, शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील एकूण ३७५ मतदान केंद्रांसाठी ४७ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

एका क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे साधारणपणे आठ ते दहा मतदान केंद्रे देण्यात आले असून मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे सहशिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या तीन ते चार व्यक्तींचा गट तयार करुन मतदान केंद्र पातळीवर मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. या उपक्रमांतर्गत आज धुळे तालुक्यातील वडगाव येथे संपर्क अधिकारी व्ही.बी. घुगे यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रवीण ओतारी, शिक्षक हेमकांत अहिरराव व गावातील सर्व गावस्तरावरील कर्मचारी यांचे तीन ते चार जणांचे गट तयार करून कुटुंबांचे वाटप करून देण्यात आले व त्यानुसार प्रत्यक्ष गृहभेटी देऊन नागरीकांना लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मत देणे किती महत्वाचे आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने आपला कसा फायदा होणार आहे हे सांगून मतदारांमधील उदासिनता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही संपर्क अधिकारी व्ही.बी. घुगे यांनी कळविले आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *